मुख्यमंत्री छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखतील, संभाजीराजे छत्रपती यांचे सूचक वक्तव्य

317 0

कोल्हापूर- राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्माम राखतील अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र शिवसेना राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो अशी ठाम भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली. मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता संभाजीराजे यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले.

संभाजीराजे छत्रपती यांनी पॅलेसमध्ये आज मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. संभाजीराजेंनी सांगितले की, माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झाली. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, मला हा ही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.

दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेवर निवडून आणण्यासाठी मराठा संघटनांकडून सध्या पडद्यामागे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून सध्या संभाजीराजे समर्थक आणि मराठा संघटनांचे पदाधिकारी शिवसेनेतील (Shivsena) मराठा आमदारांच्या माध्यमातून लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिल्याचा सेनेला राजकीय फटका बसेल, असे हे समर्थक सांगत आहेत.

दरम्यान, शिवसेना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात सहावा उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पक्ष प्रवेश न केल्यास शिवसेनेने इतर उमेदवाराचीही तयारी केली आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याही नावाची चर्चा आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!