रुपाली पाटील-ठोंबरे यांची फेसबुकवर बदनामी; मनसेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

463 0

पुणे- फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असणाऱ्यांचा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांची बदनामी करण्यात आली.याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असलेले सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भादवि कलम 354/अ, ड, 500,34 आयटी ऍक्ट क66 c 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवर एक करोड ताईवर नाराज असणाऱ्यांच्या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी फिर्यादीना फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फिर्यादी यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांना त्या ग्रुपच्या प्रोफाईलवर अॅड. रूपाली ठोंबरे यांचा फोटो दिसला. विना परवानगी त्यांचा फोटो घेऊन त्याचा वापर करून अश्लील भाषेत खिल्ली उडवत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी यांनी महिलेविषयी अश्लील भाषेत बोलू नका अशी विनंती केल्यानंतरही आरोपी सुधीर लाड याने पर्सनल फेसबुक अकाउंटवरून रूपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली.

फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत.याप्रकरणी अॅड. पुनम काशिनाथ गुंजाळ यांनी तक्रार दिली आहे.

 

 

 

Share This News
error: Content is protected !!