मुंबई : ज्येष्ठ डॉ तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांचा राजीनामा (Resignation) अखेर राज्यसरकार कडून मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर जे जे हॉस्पिटल (J J Hospital) मधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन आता थांबणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे. जे. रुग्णालयातील नऊ डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता राज्य सरकारने डॉ तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर केल्याने त्या ठिकाणी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहे. डॉ. तात्याराव लहाने यांच्यासोबत नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.. रागिणी पारेख (Dr.. Ragini Parekh) यांचा देखील स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांची प्रतिक्रिया
आपला राजीनामा मंजूर झाल्यानंतर डॉ. तात्याराव लहाने म्हणाले कि, “31 मे रोजी आपण राजीनामा दिला होता. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आमचं म्हणणं काय हेदेखील जाणून घेण्यात आलं नव्हतं. आमचं मत न घेता निवासी डॉक्टरांच्या आरोपांच्या आधारे एकतर्फी अहवाल तयार करण्यात आला होता. निवासी डॉक्टरांनी जे काही आरोप केले आहेत ते खोटे आहेत. त्यामुळे आम्ही आठ डॉक्टरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. निवृत्त झाल्यानंतरही मला सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभार व्यक्त करतो.”