रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा; प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी 50 रुपये विलंब शुल्काला स्थगिती 

2221 0

रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा; प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी 50 रुपये विलंब शुल्काला स्थगिती

सर्व रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांसाठी दिलासा देणारी एक बातमी आहे. पंधरा वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्क आकारण्याची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई स्थगित करावी, गरीब- कष्टकरी चालकांना दिलासा द्यावा, अशी विनंती वजा मागणी राज्यभरातील विविध संघटनांकडून करण्यात येत होती. आता अखेर या मागणीला यश आले आहे. 50 रुपये विलंब शुल्क भरण्याची ही कारवाई पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा शासनाने केली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.

अनेक रिक्षा चालकांना इतक्या मोठ्या प्रमाणात विलंबशुल्क भरणे परवडणारे नाही. त्यामुळेच विलंब शुल्क माफ करणे, विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन धारकांच्या संघटनांकडून शासनाकडे निवेदने देण्यात आली होती. त्यामुळेच या मागणीचा विचार करत अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली असून विलंब शुल्क आकारण्याच्या कारवाईला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे.

आ. रवींद्र धंगेकरांनी उठवला होता आवाज

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी रिक्षा- टॅक्सी चालकांना या विलंब शुल्कातून दिलासा मिळावा हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे अखेर आता चालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!