मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मुंबईच्या कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये दुसर्यांदा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या आहेत. कोर्टाने सध्या रश्मी शुक्ला यांना 1 एप्रिल पर्यंत दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे तपासामध्ये सहकार्य करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत.
केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉ. रश्मी शुक्ला या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस (Police) दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्ला यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना फोन टॅपिंग केले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या फिर्यादीवरून कुलाबा पोलिसांनी भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांना अटकेपासून संरक्षण देत 16 आणि 23 मार्च रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदविण्याच्या सूचना केल्या होत्या.
काय आहे फोने टॅपिंग प्रकरण ?
महाराष्ट्रातील सत्तानाट्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात आला होता. या टीकेला प्रत्युत्तर देत ही माहिती निराधार आहे व फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. आपल्या सरकारच्या काळात असे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. याप्रकरणी तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्यातील जनतेपुढे ठेवावा, असे फडणवीस म्हणाले होते.