राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यातून १५ हजार मनसैनिक जाणार

265 0

पुणे- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची जोरदार चर्चा सुरु आहे. या सभेपूर्वी राज ठाकरे हे पुण्यात जाणार आहेत. पुण्यातूनच राज ठाकरे औरंगाबादच्या सभेसाठी रवाना होणार आहे. आज दुपारी चार वाजता राज ठाकरे यांचे पुण्यात आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे.

आज राज ठाकरे पुण्याला जाण्यासाठी घरातून बाहेर पडताच ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात आहे. राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा ज्या परिसरातून जात आहे, त्याठिकाणी मनसैनिकांची गर्दी होत आहे. आतापर्यंत वाशी, चेंबूर आणि पनवेल याठिकाणी राज ठाकरे यांचे मनसैनिकांनी जोरदार स्वागत केले आहे. वाशीमध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आता पुढील रस्त्यातही राज ठाकरे यांचे असेच जोरदार स्वागत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज ठाकरे उद्या (दि. ३०) सकाळी ८ वाजता पुण्यातून औरंगाबादला रवाना होणार आहेत. वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे संभाजी महाराजांच्या समाधीची पूजा करून औरंगाबादच्या दिशेने निघणार आहेत. या सभेसाठी राज ठाकरे यांच्या सोबत पुण्यातून तब्बल १० ते १५ हजार कार्यकर्ते आणि १५० गाड्यांचा ताफा असणार आहे. त्याशिवाय अयोध्येतून २५०० कार्यकर्ते येणार आहेत. अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी राज ठाकरे यांच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे.

भीम आर्मीचा इशारा

राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली तर सभा उधळून लावू असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला होता. आता पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्यास घोषणा देऊन सभा उधळून लावू असा इशारा भीम आर्मीने दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide