पुणे : जिल्हा कुपोषणमुक्ती करण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील कऱ्हाटी येथे ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण २१ प्रकल्पातील ५३२ ग्राम बाल विकास केंद्रामध्ये ११६ सॅम बालके व ७७८ मॅम बालके असे एकूण ८९४ बालके दाखल करण्यात आलेली आहेत. ही ग्राम बाल विकास केंद्रे ५० दिवसाकरिता सुरु आहेत.
आहार व अतिरिक्त मानधनसाठी प्रति बालक ५० दिवसाचे ग्राम बाल विकास केंद्राकरीता २ हजार १५५ रुपये प्रमाणे आगाऊ निधी अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. केद्राकरीता प्रमाणित केलेली सर्व ७ औषधी ग्राम बाल विकास केंद्रामध्ये उपलब्ध करुन देण्यात येतात.
एसएनडीटी महाविद्यालय ऑफ होम सायन्स, पुणे यांनी प्रमाणित केलेली आहार संहितेनुसार सॅम व मॅम बालकांना दिवसातून आठ वेळा आहार देण्यात येतो. त्यामध्ये ग्राम बाल विकास केंद्राचे मध्ये दाखल होण्यापूर्वी बालकाला घरचा आहार देण्यात येतो.
सकाळी ८ वाजता नाचणी खीर,गहूसत्व खीर, सकाळी १० आणि दुपारी १२ वाजता अंगणवाडीतील आहार, दुपारी २ वाजता मेथी, कोथिंबीर मुठीया, सायंकाळी ४ वाजता केळी, सांय ६ वाजता मसाला इडली व मुरमुरा लाडू किंवा उतप्पा व मुरमुरा लाडू, रात्री ८ वाजता थालीपीठ अशा प्रकारे बालकाला आहार देण्यात येतो, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी जामसिंग गिरासे यांनी दिली आहे.