नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पवारांच्या भूमिकेमुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये आपण उमेदवार नाही असे शरद पवारांनी स्पष्ट सांगितले आहे.
देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष उमेदवाराच्या नावांची चर्चा करत आहेत. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांनी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवारांच्या नावाची देशात आणि दिल्लीत चर्चा सुरु आहे. भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी आणि एकजूट करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शरद पवार या आघाडीचे नेतृत्व करतील अशी चर्चा सुरु होती. परंतु शरद पवारांनी याला विरोध केला आहे.
‘मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसून या निवडणुकीत उमेदवार होणार नाही,’ असं शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सांगितल्याची माहिती आहे. पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षांममध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जूनला काढण्यात येणार आहे. २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान होऊन, २१ जुलैलाजी मतमोजणी करण्यात येईल. निवडणुकीसाठी एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतांपैकी केंद्रातील सत्ताधारी भाजपकडे ४८.९ टक्के मते असून, बहुमतासाठी आणखी १३ हजार मतांची आवश्यकता आहे. सर्व विरोधी पक्ष एकजूट झाल्यास भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते.
कधी होणार निवडणूक?
निवडणूक आयोगाने देशाचे नवे राष्ट्रपती निवडण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली असून, राष्ट्रपतीपद निवडणुकीचे मतदान १८ जुलैला होणार आहे. या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा २१ जुलैला जाहीर होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी भाजपने पक्षाध्यक्ष जगतप्रसाद नड्डा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावांची रविवारी घोषणा केली.