मुंबई- रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका देण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुमारास आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत १० ते १२ टक्क्यांनी वाढ करू शकतात अशी माहिती एका रिपोर्टनुसार समोर आली आहे.
यामुळे Airtel, Jio आणि Vodafone Idea चे ARPU (एव्हरेज रेव्हेन्यू पर युझर) अनुक्रमे २०० रुपये, १८५ रुपये आणि १३५ रुपये होईल. यापूर्वी कंपन्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली होती. अमेरिकन इक्विटी रिसर्च फर्म, विल्यम ओ’नील अँड कंपनीच्या भारतीय युनिटमधील इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांच्या हवाल्यानं ईटी टेलिकॉमनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानं आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ केली होती. यानंतर रिलायन्स जिओनेही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ७९ रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढून ९९ रुपयांपर्यंत पोहोचली. तर ८४ दिवसांच्या वैधतेच्या एअरटेलच्या प्लॅनची किंमत ६९८ रुपयांवरून वाढून ८३९ रुपये झाली होती.
एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ होण्याचे संकेत दिले होते. कंपनी प्रति युझर रेव्हेन्यू वाढवू इच्छित आहे आणि त्यासाठी कंपनी २०२२ मध्ये पुन्हा एकदा किंमती वाढवू शकते असंही त्यांनी म्हटलं होतं.