पुणे- पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला बाहेर काढून त्याला पट्ट्याने बेदम मारहाण केल्या प्रकरणी एका पोलीस अम्मलदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचा आदेश जारी केला.
अनिल महादेव कोळी असे निलंबित केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. अनिल कोळी हे कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. जाहेद शेख असे मारहाण झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, अनिल कोळी हे ६ एप्रिलला रात्री ९ ते ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ड्युटीवर हजर होते. रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी आरोपीला मारहाण केल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी कोळी याच्याकडे खुलासा मागितला. तेव्हा त्यांनी जाहेद शेख याचा पाय दुखत असल्याने तो सोबत असलेल्या औषध गोळ्यांची मागणी करत होता. त्याला नक्की कोणत्या गोळ्या हव्या आहेत , हे सांगता येत नसल्याने त्यास बाहेर काढून गोळ्या देऊन परत लॉकअपमध्ये ठेवून दिल्याचे कोळी यांनी सांगितले. त्याला कोणत्याही प्रकारची मारहाण केली नसल्याचे कोळी यांनी सांगितले.
मात्र लॉकअपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. यामध्ये ६ एप्रिल रोजी रात्री २३ वाजून ४२ मिनिटांनी कोळी यांनी आरोपीस लॉकअपमधून पकडून जबरदस्तीने बाहेर काढले व त्यास हाताने मारहाण करुन गार्ड रुमच्या बाजुला घेऊन गेल्याचे दिसून आले. तसेच २३ वाजून ४४ मिनिटांनी पट्ट्यासारखी वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आले . त्यानंतर त्यास पुन्हा हाताने मारहाण करुन आरोपीला लॉकअपमध्ये ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
त्यामुळे कोळी यांनी आरोपी जाहेद शेख याला अनाधिकाराने बाहेर काढून त्यास मारहाण केल्याचे आढळून आल्यामुळे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पोलीस अंमलदार अनिल कोळी याला निलंबित केले.