पुणे- पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएमपीएमएलच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने खूशखबर दिली आहे.
७ व्या वेतन आयोगानुसार वाढणारे वेतन देण्यासाठी पुणे महापालिका महिन्याला 6 कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका 4 कोटी रुपये देणार आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फरक पुढील पाच वर्षांत देण्यात येणार असून त्यासाठी पुणे महापालिका आपल्या हिश्श्याची 261 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम पुढील पाच वर्षांत समान हप्त्याने देणार आहे. ही रक्कम पीएमपीला दरवर्षी दिल्या जाणाऱ्या संचलन तुटीतून वसूल केली जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.
अतिरिक्त निधीची केली होती मागणी
पीएमपीएमएल संस्थेला संचलन तुटीमुळे होणारा खर्च सन 2013-14 पासून महापालिकेच्या स्वामित्व हिश्शानुसार (60 टक्के) दिला जातो. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षातील संचलन तूट या वर्षात दरमहा 20 कोटी रुपये याप्रमाणे पीएमपीएमएलला दिली जात आहे.करोना काळामुळे पीएमपीएमएलचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महामंडळाचे संचलन विस्कळीत होऊ नये म्हणून पुणे महापालिकेकडून 88 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. आजच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या आंदोलनास आज यश आल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
आंदोलनानंतर महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात मोठा रोष निर्माण होऊ शकतो असे दिसताच सत्ताधारी भाजपने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत आहे, परंतु आपल्या न्याय्य हक्कांसाठी पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलन करावे लागले ही बाब दुर्दैवी असल्याचं जगताप यांनी म्हटले आहे.