पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने अवघ्या तीन मिनिटाच्या ऑनलाइन सभेत 180 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. निवडणूक निधी उभारण्यासाठी घाई गडबडीत विकासकामे मंजूर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सदस्यांची मुदत 13 मार्च 2022 ला संपत असल्याने अगदी घाईघाईत विकास कामे मंजूर करण्याचा सपाटा महापालिकेतील सत्ताधारी भाजपने लावला आहे. यामध्ये महापालिका आयुक्त देखील मागे राहिलेले दिसत नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील 22 कोटी रुपयांचा निधी ऐनवेळी मंजूर करून घेतला आहे.
स्थायी समिती बैठक सुरू होत असताना फक्त 36 प्रस्ताव मंजुरीसाठी आले होते. मात्र, ऐनवेळी जवळपास 50 विकासकामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले. अशी एकूण 180 कोटी रुपयांची 86 विकासकामे स्थायी समितीने फक्त 30 मिनिटात मंजूर केली आहेत. स्थायी समितीच्या कामकाजावर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक निधी उभा करण्यासाठी आणि कंत्राटदारांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी स्थायी समिती अतिशय घाईगडबडीत विकासकामे मंजूर करत आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.