पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी मोजावे लागणार पैसे

382 0

पुणे – पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आता मोफत वाहने पार्क करता येणार नाहीत. याठिकाणी पे अँड पार्क योजना लागू करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.

शहरात खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले असून पार्किंगचा प्रश्नही निर्माण होत आहे. पार्किंगसाठी शिस्त लागावी, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा यादृष्टीने प्रशासनाने आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर पे अँड पार्क योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रमुख रस्ते कोणते असतील हे अद्याप निश्चित झाले नसले तरी याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बैठक पार पडली आहे. आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, “शहरातील प्रमुख रस्त्यांवर पेन पार्क सुविधा चालू केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. हे रस्ते कोणते असतील हे अद्याप ठरलेले नाही पण वाहतूक पोलिसांशी चर्चा करून लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाईल.”

सत्ताधारी भाजपनेच मंजूर केले सशुल्क पार्किंग व्यवस्थेचे धोरण

महापालिकेत भाजपची सत्ता असताना शहरातील रस्त्यांवर सशुल्क पार्किंग व्यवस्था करण्याचे धोरण मंजूर झाले होते. त्यास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळालेली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल अशी शक्यता निर्माण झाल्याने हा प्रस्ताव तत्कालीन महापौरांच्या विचारासाठी पाठविण्यात आला होता. महापौर व पक्षनेत्यांच्या बैठकीत पे अँड पार्किंग साठी कुठले रस्ते निवडले जावेत यावर चर्चा होणार होती. पण हा निर्णय सर्वच पक्षांना अडचणीचा ठरणार असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता.

Share This News
error: Content is protected !!