पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस कार्यालयात येण्याची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

682 0

मुंबई- मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबई पोलिसांच्या कार्यालायत येण्याची गरज लागणार नाही. संजय पांडे यांनी ही बातमी ट्विटद्वारे दिली आहे.

मुंबई पोलीस दलाच्या आयुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांना दिलासा देणारे निर्णय सुरु केले आहेत. मुंबई पोलिसांकडून नो पार्किंगमध्ये लावली जाणारी वाहनं क्रेनद्वारे न उचलण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला होता. यानंतर आता मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस कार्यालयात येण्याची गरज नाही याबाबतचा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

भारतीय नागरिकाला कोणत्याही कारणासाठी देशाबाहेर जायचं असल्यास त्याकडे पासपोर्ट असणं आवश्यक असतं. पासपोर्ट काढण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीबद्दल पडताळणी केली जाते. यामध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनला जावं लागतं. या प्रक्रियेत अनेकदा वेळ लागतो. नागरिकांना देखील अनेकदा पोलीस स्टेशनला जावं लागतं. मात्र, आता पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस स्टेशनला बोलावणार नसल्याचं संजय पांडे यांनी म्हटलं आहे. अपवादात्मक स्थितीत नागरिकांना पोलीस स्टेशनला यावं लागेल, असं ते म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी या निर्णयाचं पालन होत नसल्यास थेट तक्रार दाखल करा, असं आवाहन संजय पांडे यांनी केले आहे.

संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईकरांनी सोशल मीडियावरुन या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुंबई करांनी संजय पांडे यांच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. संजय पांडे आगामी काळात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोण कोणते निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.

Share This News
error: Content is protected !!