Breaking News

आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार; काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ? कोणाला मिळणार लाभ ? वाचा सविस्तर

1955 0

सर्वसामान्यांसाठी आणि विशेषतः गृहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या सन 2024- 25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून योजनेचा प्रत्यक्ष लाभ 1 जुलै 2024 पासून देण्यात येणार आहे.

कोणाला मिळणार लाभ ?

योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता पात्र ठरणारे लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. शिधा पत्रिकेनुसार एका कुटुंबातील केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. सदरचा लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येणार आहे. विभक्त करण्यात आलेल्या शिधापत्रिकातील कुटुंबास लाभ मिळणार नाही. ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही.

कसा मिळणार लाभ ?

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन मोफत सिलेंडर तेल कंपन्यांमार्फत वितरण करण्यात येतील. योजनेंतर्गत तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे ५३० रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करायची आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, तेल कंपन्यांना करावयाच्या प्रतीपूर्ती संदर्भातील तक्रारीचे निराकरण करणे तसेच योजनेच्या एकूण संचालन व समन्वयासाठी नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!