न्यूयॉर्क- अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील क्वीन्स परिसरात शीख समुदायाच्या दोन जणांवर हल्ला करून लूटमार करण्यात आली. क्वीन्समधील शीख समुदायाच्या सदस्यांवर दहा दिवसांत झालेला हा दुसरा हल्ला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला येथे एका वृद्ध शीख व्यक्तीवर हल्ला झाला होता.
न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, या घटनेसंदर्भात तक्रार नोंदवण्यात आली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दूतावासाने सांगितले की आपण समुदायाच्या सदस्यांच्या संपर्कात असून पीडितांना सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहोत. मानवाधिकार संघटना शीख कोलिशन यांनी मंगळवारी सांगितले की रिचमंड हिल, क्वीन्स येथे दोन शीखांवर हल्ला करून त्यांना लुटण्यात आले. 3 एप्रिल रोजी निर्मल सिंह यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला होता, त्या ठिकाणाजवळ हा हल्ला झाला. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोपनीयतेमुळे त्यांची नावे आम्ही जाहीर करत नसल्याचे
शीख कोलिशनने म्हटले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्थानिक लोक आणि पोलिस दोन व्यक्तींना घेरताना दिसत आहेत. यामध्ये एक जखमी रस्त्याच्या कडेला बसलेला दिसत आहे, तर दुसरा त्याच्या शेजारी उभा असून त्याच्या डोळ्याजवळची जखम कापडाने झाकलेली आहे. व्हिडिओमध्ये शीख समुदायाचे दोन लोक डोक्यावर पगडीशिवाय दिसत आहेत.