राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ; महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आंदोलन

490 0

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महाविकासआघाडीमधील घटक पक्षांनी बालगंधर्व चौकात आज मूक आंदोलन केले.

पुण्यात महागाईच्या मुद्यावरुन जोरदार राजकीय राडा झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महागाई विरोध आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या कार्यक्रमस्थळी म्हणजेच बालगंधर्वमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांमध्ये फिर्याद देखील दाखल करण्यात आली.

आज सकाळी या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बालगंधर्व चौकात आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे गजानन थरकुडे, वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वैशाली नागवडे म्हणाल्या, “आम्ही महागाई कमी व्हावी म्हणून स्मृती इराणी यांना जाब विचारणार होतो. पण मला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. याचा मी निषेध करत आहे. आम्ही महागाई कमी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”

रमेश बागवे म्हणाले, “भाजपची गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या घटक पक्षांमधील महिलांवर जो हल्ला झाला आहे तो आम्ही खपवून घेणार नाही याचा भाजपला जाब द्यावेच लागेल”

प्रशांत जगताप म्हणाले, “येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम्ही भाजपला दाखवून देऊ. पुणे शहर हे सभ्य नागरिकांचे शहर आहे. त्यामुळे पुणेकर भाजपची गुंडगिरी खपवून घेणार नाहीत”

Share This News
error: Content is protected !!