मुंबई- मंत्री नवाब मलिक तुरुंगात पडल्यामुळे त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केल्यापासून ते तुरुंगात आहेत. टेरर फंडिंग आणि मनी लॉन्डरिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडी मलिक यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. मलिक यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र ईडीने जामीन अर्जाला विरोध केला आहे. पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली.
याआधी शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने त्यांच्या तात्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज फेटाळला होता.
आता नवाब मलिक तुरुंगात पडल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशा माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी दिली आहे.