राणा दांपत्याला मुंबई पोलिसांची बजावली १४९ ची नोटीस

391 0

मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा शुक्रवारी पहाटेच त्यांच्या खार येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. या ठिकाणी मुंबई पोलिसांनी खारमधील त्यांच्या घरी जाऊन त्यांना कलम १४९ ची नोटीस बजावली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी मंजुनाथ सिंगे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना ही नोटीस दिली. या नोटीसचे उल्लंघन केल्यास राणा दाम्पत्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नका असेही आवाहन राणा दांपत्याला करण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले असताना राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक एकवटले आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हनुमान जयंतीला सर्वच राजकीय पक्षांकडून विविध शहरात हनुमान चालीसाचे पठाण करण्यात आले. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठाण केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण करावे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण होणार नसेल तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू असे आव्हान राणा दांपत्यांनी शिवसेनेला दिले होते. त्यानुसार राणा पतिपत्नी मुंबईत दाखल झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!