मुंबई – खासदार नवनीत राणा यांना अटक करण्याची कारवाई मुंबई पोलिसांच्या अंगाशी येणार आहे अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. नवनीत राणा यांनी संसदीय समितीकडे या प्रकरणी तक्रार दाखलकेली होती. या तक्रारीची गंभीर दाखल घेण्यात आली असून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे.
१५ जून रोजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह भायखळा कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनाही दिल्लीला येण्याचा आदेश दिले आहेत. 15 जूनला दुपारी साडेबारा वाजता संसदीय समिती समोर ही सुनावणी होणार आहे.
हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालीसाचे वाचन करावे अन्यथा मी व नवनीत राणा ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालीसाचे वाचन करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिला होता. यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर राणा दांपत्याला राजद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात आली. आपल्याला जेलमध्ये योग्य वागणूक मिळाली नसल्याची तक्रार नवनीत राणा यांनी संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिकाऱ्यांना हजर राण्यांचे आदेश देण्यात आले आहेत.