गनिमी कावा पद्धतीने राणा दाम्पत्य मुंबईत; मातोश्रीच्या परिसरात शिवसैनिक सज्ज

244 0

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहेत. नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये राणा दाम्पत्य उतरले असून त्याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खाजगी वाहनाने नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नागपूर विमानतळावरुन मुंबईला रवाना झाले. खासदार नवनीत राणा यांना पुरवण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा न घेता त्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.

आपण रेल्वेने कार्यकर्त्यांसोबत मुंबईत जाणार असल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले. राणा दाम्पत्याने घेतलेल्या या भूमिकेनंतर शिवसैनिकांनीही आक्रमक पवित्रा घेत त्यांना रोखण्याची रणनिती आखली. मात्र, शिवसैनिकांची ही रणनिती लक्षात घेता राणा दाम्पत्याने गनिमी कावा पद्धतीचा वापर केल्याचं दिसून येत आहे.

दुसरीकडे राणा दाम्पत्याकडून गनिमी काव्याचा वापर करून मातोश्रीच्या परिसरात प्रवेश होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच याठिकाणी शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावेत, आम्ही सज्ज आहोत, असे आव्हान शिवसैनिकांकडून देण्यात आले आहे. राणा दाम्पत्य कधीही याठिकाणी येईल, ही शक्यता गृहीत धरून शिवसैनिक आजपासूनच मातोश्रीबाहेर पहारा देण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी ‘मातोश्री’ची सुरक्षा वाढवली

नवनीत राणा उद्या सगळ्यांना चकवा देत मातोश्रीपर्यंत पोहोचल्या तरी मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी मातोश्रीबाहेरील बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केली आहे. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!