“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान ; आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

447 0

दिल्ली : ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध श्रेणीत मराठी चित्रपटांना ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज 68 वा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आशा पारेख यांच्या विषयी
आशा पारेख एक सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता आहेत. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. या काळात त्यांना ‘हिट गर्ल’ म्हणून संबोधले जात होते. चित्रपटसृष्टीत त्यांची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली. अभिनेत्री म्हणून सुमारे 95 चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. यामध्ये कटी पतंग, मै तुलसी तेरे आंगन की, दो बदन, मेरा गाँव मेरा देश, दिल देके देखो, आये दिन बहार के, आया सावन झुमके, तिसरी मंजिल, काँरवा अशा विविध चित्रपटांचा समावेश आहे. श्रीमती पारेख यांना 1992 मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले.

श्रीमती पारेख यांनी त्यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मागील 60 वर्षांपासून सिनेक्षेत्रात काम करीत असून आजही आपण या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगीतले.

सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार “तानाजी : द अनसंग वॉरिअर” या चित्रपटास देण्यात आला. याची निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केली असून दोघांनी सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोख रकमेचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

अजय देवगण आणि तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट – सोराराई पोट्रु) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रुपये असे आहे.
तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभूषेसाठीही पुरस्कार जाहिर झाला होता. वेशभुषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ ने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर निर्मित ‘तुलसीदास ज्युनिअर’ या चित्रपटास सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“फनरल” या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयाच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार

महिला व बालकांच्या सक्षमीकरणावर आधारित तसेच अनिष्ट चालीरीतींवर बोट ठेवणारा “फनरल” या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते बीफोर – आफ्टर एंटरटेन्मेट व दिग्दर्शक विवेक दुबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रुपये, रजत कमळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

“टकटक” आणि “सुमी” चित्रपटातील बाल कलाकार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

“टकटक” आणि “सुमी” या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर झाला होता. “सुमी” सिनेमातील आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या बालकांना तर “टकटक” या सिनेमासाठी अनिष मंगेश गोसावी यांना रजत कमळ प्रदान करण्यात आले.

‘सुमी’ ठरला उत्कृष्ट बाल चित्रपट
“सुमी” या चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती हर्षला कामत एंटरटेन्मेंट यांनी केली आहे, तर दिग्दर्शक अमोल गोळे यांनी केलेले आहे. या दोघांनाही सुवर्ण कमळ आणि प्रत्येकी 1 लाख 50 हजार रोख राशी देवून सन्मानित करण्यात आले.

तीन मराठी चित्रपटांना विशेष परीक्षक पुरस्कार प्रदान
विशेष परीक्षक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या ‘जून’, ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या तीन पुरस्कारांनाही गौरविण्यात आले. जून चित्रपटासाठी सिद्धार्थ मेनन यांना तर ‘गोदाकाठ’ व ‘अवांछित’ या दोन्ही चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

“मी वसंतराव” या मराठी चित्रपटातील शास्त्रीय पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना रजत कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. तसेच, या चित्रपटाला उत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कारही जाहिर झाला होता. चित्रपटाचे साऊंड डिझायनर अनमोल भावे यांना रजत कमळ आणि 50 हजार रु. रोख रकमेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदी सिनेमा “सायना”तील गीतासाठी गीतकार मनोज मुंतशिर यांना रजत कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नॉन फिचर फिल्म श्रेणीत मराठी “कुंकुमार्चन” चित्रपटाला पुरस्कार प्रदान
कौटुंबिक मुल्यांवर आधारित “कुंकुमार्चन (देवींची पूजा अर्चना)” या मराठी चित्रपटाला उत्कृष्ट कौटुंबिक मूल्यांचा पुरस्कार जाहीर झाला होता. या चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ फिल्मी माँक्स आणि दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी केलेली आहे. या दोघांनाही प्रत्येकी 50 हजार रूपयांचा रजत कमळ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पराया या मराठी/हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक विशेष अय्यर यांना प्रदान करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती एमआईटी स्कूल ऑफ फिल्म ॲण्ड टेलिविजन, पुणे यांची आहे. हा पुरस्कार एमआईटी स्कूल ऑफ फिल्म ॲण्ड टेलिविजनचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी स्वीकारला.

Share This News

Related Post

गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा; सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

Posted by - November 15, 2022 0
पुणे : गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात…
Nalsab Mulla

Nalsab Mulla Shot Dead : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Posted by - June 18, 2023 0
सांगली : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये शनिवारी रात्री राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या (Murder)…
Ajit Pawar Speech

Ajit Pawar : मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा; अजित पवारांचे कार्यकर्ता मेळाव्यात मोठं विधान

Posted by - June 21, 2023 0
पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे तयारी दर्शवली…

बुलेटराजांच्या पुंगळ्या टाइट ! कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

Posted by - November 15, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवत बुलेटचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल 195 बुलेटचालकांकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *