मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये वाद पेटला आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून नोटीस मिळालेली आहे. आता त्या विरोधात नारायण राणेंनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. आज या संबंधी सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं अधिश नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेनं दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर महापालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभागाकडून काही दिवसांपूर्वी नारायण राणेंच्या ‘अधिश’ बंगल्यातील बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली. पुढील 15 दिवसांत स्वत:हून अतिरिक्त अनधिकृत बांधकाम पाडून टाका, नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले.
आता नारायण राणेंनी या नोटीशीविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. आज या प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे केंद्रीयमंत्री राणे यांच्या अधिश बंगल्याचा वाद ?
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. बंगल्यात केलेले बदल मंजूर केलेल्या प्लॅननुसार असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले होते. यानुसार राणे यांनी सर्व कागदपत्रे पालिकेला दाखवली. परंतु पालिकेचे समाधान न झाल्याने दुसरी नोटीस पाठवण्यात आली. 21 फेब्रुवारी पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाने बंगल्यात जाऊन तपासणी केली होती. सर्वच मजल्यांवर ‘चेंज ऑफ यूज’ झाले असून बहुतांश ठिकाणी गार्डनच्या जागी रूम बांधल्याचा नोटीसीत उल्लेख आहे.