मुंबई- जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. मातोश्रीच्या सांगण्यावरूनच ही तक्रार करण्यात आली. असा आरोप केंदीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या घराला मुंबई महापालिकेने दिलेल्या घराच्या नोटीशीवरून खुलासा केला.
तुमच्या घराला बीएमसीची नोटीस आलीय असे अनेकांचे फोन आले माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी. त्यामुळे सर्वांसमोर वास्तव सांगावं यासाठी तुमच्या समोर आलो आहे. माझ्या जुहूच्या घरात 17 सप्टेंबर 2009 मध्ये आलो. 14 वर्ष झाली मी या घरात आलो. नामांकित आर्किटेक्टने या इमारतीचे डिझाइन केले आहे. ही इमारत बांधल्यानंतर 1991च्या डीसी रुलप्रमाणे इमारत बांधली आणि पजेशन देण्यात आलं. ओसी आणि सीसी दोन्ही गोष्टी पालिकेने दिल्या होत्या. मी एकही गोष्ट अपूर्ण ठेवली नाही. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलं नाही. काही आवश्यकताच पडली नाही. माझे दोन मुले. त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुले असं सहा जण आम्ही या घरात राहतो. त्यामुळे या ठिकाणी हॉटेल किंवा कोणताही व्यवसाय चालत नाही. ही इमारत 100 टक्के निवासी आहे. 100 टक्के कायदेशीर इमारत असतानाही शिवसेनेकडून, मातोश्रीकडून काहीजणांना सांगून तक्रार करायला लावली, असं नारायण राणे यांनी सांगितलं.
ठाकरे यांना उद्देशून राणे म्हणाले, “त्यांनी मातोश्री दुरुस्त केली. मातोश्री पार्ट टू तयार केली. मातोश्री पार्ट टूसाठी पैसे भरून इलिगल काम लिगल करून घेतलं. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लान माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घरावर किंवा नोकरीवर जात नाही म्हणून गप्प आहे. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्याने 2015 आणि 2016 मध्ये तक्रारी करण्यात आल्या. प्रत्येकवेळी महापालिकेचे सर्व प्लान बघितल्या गेले आणि काही इलिगल नाही असं पालिकेकडून सांगितलं गेलं. हा दुष्टपणा वारंवार केला गेला”
दिशा सालियानची आत्महत्या नव्हे तर सामूहिक बलात्कार करून खून
‘8 जून रोजी दिशा सालियानची बलात्कार करून आत्महत्या करण्यात आली. तिला पार्टीला जायचे नव्हते, तरी तिला तिच्या रोहन राय नावाच्या मित्राने थांबवले. तरीही ती घरी निघाली. त्यानंतर तेथे कोण कोण होतं? तिच्यावर बलात्कार होत असताना पोलीस प्रोटेक्शन कोणाला मिळत होतं? दिशा सालियानच्या पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट अद्याप आला नाही. ती ज्या इमारतीत राहायची, त्या दिवसाची ८ जूनची पाने फाडण्यात आली. ती गायब आहेत.’ असा गंभीर आरोप राणे यांनी केला.
तिच्याविषयी सुशांत सिंहला कळाल्यावर त्याने म्हटले की, ‘मै इन लोगो को छोडूंगा नही’. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्यात त्याची हत्या करण्यात करण्यात आली. तेथे कोणत्या मंत्र्याची गाडी होती. सीसीटीव्ही फूटेज गायब कसे झाले. ठराविक माणसांची एम्बुलन्स कशी आली. सर्व पुरावे कसे नष्ट करण्यात आले. त्यात कोणते अधिकारी होते. हे लवकरच उघड होणार आहे. असा गंभीर आरोप देखील राणे यांनी केला आहे.