राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे)(MNS) न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव (AVINASH JADHAV)यांनी ॲड. असीम सरोदे (ASIM SARODE)यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात (MUMBAI HIGH COURT)याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत बिनविरोध निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, यामागे दबाव, आर्थिक व्यवहार आणि लोकशाही मूल्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप मनसेने(MNS) केला आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्यामुळे मतदारांना मतदानाचा अधिकार वापरण्याची संधीच मिळत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
मनसेच्या मते, निवडणूक ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असून विशेषतः महानगरपालिकांसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिनविरोध निवडी वाढणे ही चिंतेची बाब आहे. अशा प्रकारांमुळे लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मनसेने न्यायालयाकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत. बिनविरोध उमेदवार निवडण्यामागील प्रक्रिया पारदर्शक आहे का, याची सखोल चौकशी करावी, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव किंवा धमकी देण्यात आली का याचा तपास व्हावा, तसेच भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी स्पष्ट नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरवावीत, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
या याचिकेमुळे राज्यातील महानगरपालिका निवडणुकांतील बिनविरोध प्रक्रियेवर आता न्यायालयाची नजर जाणार असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.