पुणे शहर मनसेचा गड ढासळतोय का ? (संपादकीय )

492 0

आधी रुपाली ठोंबरे मग वसंत मोरे यांची उघड नाराजी आणि आता निलेश माझिरे; पुणे शहर मनसेतील ‘ते’ झारीतील शुक्राचार्य कोण ?

मागील काही दिवसांपासून पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अंतर्गत बंडळीचे ग्रहण लागले आहे. सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मर्दानी अशी ओळख असलेल्या ॲड.रुपाली पाटील-ठोंबरे यांना स्वपक्षीय नेत्यांनी घायाळ करण्याचा केल्यानंतर या अंतर्गत वादाला कंटाळून ॲड.रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत 16 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर मशिदींवरील भोंगे उतरले गेले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले खरे, मात्र मी एक लोकप्रतिनिधी असून मला माझा प्रभाग शांत हवा आहे अशी भूमिका पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी घेतल्यानंतर मोरे यांना शहराध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं.

त्यानंतर वारंवार मनसेतील काही नेत्यांवर नाराज असल्याचं मोरे यांनी वारंवार बोलून देखील दाखवलं मात्र मी राज ठाकरेंचा मावळा असून मी मनसे सोबतच आहे अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आणि मनसेमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र वसंत मोरे यांचे निष्ठावंत समर्थक अशी ओळख असणारे पुण्यातील मनसेच्या माथाडी सेनेचे अध्यक्ष निलेश माझिरे यांनी मनसे सोडत असल्याचं जाहीर केलं त्यामुळे पुणे शहर मनसेचा गड अंतर्गत वादामुळे ढासळतोय का ? असाच प्रश्न यानिमित्तानं उभा राहतोय. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पुणे महानगपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी स्वतः या अंतर्गत वादाकडे लक्ष देऊन पुणे शहरातील मनसेचं इंजिन ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न करावेत हीच पवनपुत्र हनुमानाचरणी प्रार्थना

 

 

 

 

 

– संकेत देशपांडे

वार्ताहर

Share This News
error: Content is protected !!