नाशिक- पीएनबी घोटाळ्यातील आरोपी फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळील मुंढेगावात असलेल्या बळवंत नगर मधील 9 एकर २८ गुंठे शेतजमीन आयकर विभागाने जप्त केली आहे. या कारवाईने मेहुल चोक्सी सोबत व्यवहार केलेल्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी मुख्य आरोपी नीरव मोदीची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती.
चोक्सी याने नाशिक जिल्ह्यात आणखी कोणाकोणाशी व्यवहार केले आहेत याची अय्यर विभागाकडून चौकशी सुरु झाली असून अनेकजण आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. चोक्सी याने इगतपुरी तालुक्यात बनावट कंपन्या स्थापन करून त्यांच्या नावावर जमिनीची खरेदी केली. त्यापैकी काही जमिनी त्याने विकल्या. भविष्यात चोक्सी या जमिनी विकू शकतो म्हणून आयकर विभागाने कारवाई करून जमीन जप्त केली आहे.
मेहुल चोक्सी रिटेल ज्वेलरी कंपनी गीतांजली ग्रुपचा मालक आहे आणि नीरव मोदीचा काकाही आहे. या दोघांवर पंजाब नॅशनल बँकेची १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. चोक्सी आणि नीरव मोदी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळून गेले होते. फेब्रुवारीमध्ये सीबीआयने या कथित घोटाळ्याचा तपास सुरू केला होता.
चोक्सी भारतातून पळून गेल्यानंतर जून 2018 मध्ये मुंबईच्या न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आणि जुलै 2019 मध्ये इंटरपोलनेही चोक्सीविरुद्ध रेड नोटीस जारी केली. चोक्सीने 2018 मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले आणि तेव्हापासून तो अँटिग्वा आणि बारबुडा येथे राहतो. चोक्सी 23 मे 2021 रोजी अँटिग्वा येथून बेपत्ता झाला आणि दुसऱ्याच दिवशी डॉमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. चोक्सीचे वकील विजय अग्रवाल, वेन मार्श आणि त्याची पत्नी प्रीती चोक्सी यांनी त्यांचे अपहरण करून डॉमिनिका येथे आणण्यात आल्याचा आरोप केला आहे.