नवी दिल्ली- दिल्लीतील गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी-शनिवारी रात्री उशिरा आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे काम सुरू केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र आगीत 30 झोपड्या जळून खाक झाल्या असून सात जणांचा मृत्यू झाला. या आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार-शनिवारी दुपारी एकच्या सुमारास दिल्लीतील गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीत आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तेथील झोपडपट्ट्यांना लागलेली भीषण आग विझविण्याचे काम सुरू केले. आगीत 60 झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आतून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले.
हे 7 मृतदेह वेगवेगळ्या कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी झोपडपट्ट्यांचा मोठा परिसर असल्याने आव्हानानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. आगीचे कारण अद्याप अधिकृतपणे समजू शकलेले नाही. मात्र तेथे सिलिंडर स्फोटाचे आवाज आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.