मुंबई : शिंदे गट आणि भाजपने एक साथ येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर गणेशोत्सव काळामध्ये राज ठाकरे यांच्या भाजप आणि शिंदे गटासोबत झालेल्या भेटीगाठी आणि चर्चांमुळे मनसे शिंदे गटासोबत युती करणार अशा चर्चेला उधाण आले होते. दरम्यान आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी युती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी काळातील सर्व महानगरपालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही मुंबईत 227 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आम्ही स्वतंत्र आहोत. सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मनसेनं एकला चलो रे चा नारा देऊन युतीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.