भोपाळ- मध्यप्रदेशमधील सीधी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका युट्यूब पत्रकारासहीत आठ जणांना अटक केली. त्यानंतर या सर्वांचे कपडे उतरवून त्यांना पोलीस ठाण्यात अर्धनग्न उभे केले. या घटनेचा फोटो व्हायरल होताच पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबतची माहिती अशी की, थिएटर आर्टिस्ट नीरज कुंदर यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन केल्याच्या आरोपावरून या आठजणांना अटक करण्यात आली. भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ला आणि त्यांचे चिरंजीव गुरु दत्त यांच्याविरोधात बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नीरज कुंदर यांना अटक करण्यात आली होती.
नीरज यांच्या अटकेच्या निषेधार्थ युट्यूब जर्नालिस्ट कनिष्क तिवारी आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार आंदोलन केलं होतं. हे सर्वजण पोलीस आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि या सर्वांचे कपडे उतरवून त्यांना पोलीस ठाण्यात अर्धनग्न उभे केले. या घटनेचा फोटो व्हायरल होताच पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला हटवण्यात आलं असून या प्रकरणाची अतिरिक्त पोलीस अधीक्षकामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.