महत्वाची बातमी ! धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने घेतला हा निर्णय

228 0

मुंबई- नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. याच आदेशावर शिक्कामोर्तब करत करत राज्य सरकारने धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक असणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सोबत बैठक घेणार आहेत. राज्यातील कायदा व्यवस्थावर चर्चा करून एक दिशानिर्देश तयार करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांत गाईडलाईन जारी केली जाईल. सोशल मीडियावर देखील पोलिसांचे लक्ष राहणार असून या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

काय आहेत नाशिकच्या पोलीस आयुक्तांचे आदेश ?

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई केली जाणार. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी. अजाणपूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मीटर लांब हनुमान चालीसा लावता येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. तसंच त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यात नमूद केलंय. इतकंच काय तर पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण न करण्याचा इशाराही दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्याविरोधात आवाज उठवला होता. तर मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास हनुमान चालिसाही भोंगे लावून करू असा इशारा दिला होता. मात्र, आता या मुद्द्याला राज्याच्या गृहविभागाने गांभीर्याने घेतलं आहे.

Share This News
error: Content is protected !!