मुंबई- राज्यसभेसाठी एक एक महत्वाचे असल्याने महाविकास आघाडी मधील घटक पक्ष आणि भाजप यांनी आपल्या प्रत्येक आमदाराच्या मतावर लक्ष ठेवले आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांना मतदानासाठी विधान भवनात आणण्यात आलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना विशेष अँब्युलन्समधून विधान भवनात दाखल झाले. या दोघांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व आमदारांना ‘हॉटेल ताज’ मध्ये ठेवलं होतं. मात्र चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आजारी असल्याने हॉटेलमध्ये नव्हते. मतदानादिवशी सकाळी विधिमंडळात आणण्याचं नियोजन भाजपने केले. आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी मुक्ता टिळक यांनी मुंबईत येऊन मतदान करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्या मुंबईत दाखल झाल्या. आज सकाळी मुक्ता टिळक यांना रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. त्यानंतर स्ट्रेचरवरुन मुक्ता टिळक यांना विधानभवनात मतदानासाठी नेण्यात आले.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार गिरीश महाजन होते.
आमदार लक्ष्मण जगताप यांना सकाळीच पुण्याहून रुग्णवाहिकेतून मुंबईत आणण्यात आलं. लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून प्रकृती खालावल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मधल्या काळात त्यांचा आजार इतका बळावला होता की, ते कोमातही गेले होते. दरम्यान, कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जून रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांची एकूण प्रकृती पाहता मुंबईला पाठिविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय राजी नव्हते. त्यांची एकूण अवस्था पाहिली तर जगताप यांच्या आरोग्यावर अधिकचा ताण येईल, अशी कुटुंबीयांची भूमिका होती. मात्र, पक्षादेश असल्याने आपण मतदानाला जाणार असे लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ते पुण्याहून मुंबईला रवाना झाले.
त्यानुसार सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास टिळक आणि आमदार जगताप यांना विधिमंडळात आणण्यात आले. मुक्ता टिळक यांना तर स्ट्रेचरवर बसून विधिमंडळात आणण्यात आलं होतं. या दोघांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.