पुणे : बेकायदेशीर जाहिराती किंवा विनापरवाना भिंती रंगवल्या तर महापालिका कारवाई करते. महापालिकेने काही दिवसांपूर्वी आकाशचिन्ह धोरण जाहीर केलं आहे. त्यात भिंतीवर विनापरवाना रंगरंगोटी केल्यास कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय. याच मुद्द्याची दखल घेत कोथरूडच्या एका सोसायटीने महापालिकेलाच 16 लाख रुपयांचं बिल पाठवून सजग नागरिक म्हणून दणका दिला.
कोथरूडच्या गुळवणी महाराज रस्त्यावरील ‘स्वप्नशिल्प’ ही 484 सदनिकांची सोसायटी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीच्या भिंतींवर महापालिका परवानगी न घेता जाहिराती रंगवत आहे. आकाशचिन्ह धोरणानुसार सोसायटीने 16 लाख रुपयांचं बिल महापालिकेला पाठवलं.
महापालिकेने आपली चूक कबूल करतानाच उत्पन्न कमावण्याच्या दृष्टीने नव्हे तर जनजागृती करणाऱ्या शासनाच्या जाहिराती केल्या आहेत. महापालिकाकडे सध्या निधीची कमतरता आहे. निधी उपलब्ध झाल्यावर भिंत पूर्ववत करू, असं वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त राजेश गुर्रम यांनी पत्राद्वारे कळवलं. विशेष म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाची इमारत सोसायटीला लागूनच आहे.