मुंबई- आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत निधीचा अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर सोमय्या पितापुत्रांच्या विरोधात एका निवृत्त जवानाने ट्रॉमबे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती.
या प्रकरणी सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, “मुंबई पोलिसांकडे एकही कागद नाहीये. तक्रारदारांनी सांगितलं की, संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवरुन आम्ही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतजी 17 डिसेंबर 2013 रोजी ज्यावेळी आपण सगळे राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर राज्यपालांकडेही गेलो होतो. त्यावेळी शिवसेनेते मोठे नेतेही होते. ठाकरे सरकारच्या घोटोळेबाजांविरुद्ध कारवाई होईपर्यंत किरीट सोमय्या मागे हटणार नाही, शांत बसणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.”