पिंपरी- क्रिप्टो करन्सीच्या मोहापायी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच एका व्यक्तीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 300 कोटींची क्रिप्टोकरन्सी व आठ लाख रुपयांच्या खंडणी वसुलीसाठी अपहरण केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आले आहे.
या प्रकरणी दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी मूळ सिंदखेडराजा बुलडाणा) असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सुनील राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशिनाथ काटे, शिरिष चंद्रकांत खोत, संजय उर्फ निकी राजेश बन्सल अशी अन्य आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी रफिक अल्लउद्दीन सय्यद यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप खंदारे हा पूर्वी पुणे सायबर पोलीस शाखेत कार्यरत होता. त्यावेळी त्याने ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, ॲडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी, बेसिक कॉम्प्युटर हार्डवेअर अँड टेक्नॉलॉजी आणि मोबाइल फॉरेन्सिक यासारखे आधुनिक कोर्स केले होते. पुणे सायबर विभागात काम करत असताना त्याला नाईक यांच्याकडे सुमारे 300 कोटींच्या क्रिप्टोकरन्सीबाबत समजले. त्यामुळे त्याने नाईक यांचे अपहरण करून पैसे उकळण्याचे ठरविले.
त्यासाठी खंदारे याने त्याचे साथीदार सुनील राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशिनाथ काटे, शिरिष चंद्रकांत खोत, संजय उर्फ निकी राजेश बन्सल यांना सोबत घेऊन वडगाव मावळ येथे हा कट रचला. त्यानुसार नाईक यांचे ताथवडे येथून अपहरण करून त्यांना अलिबाग येथे डांबून ठेवले व पैशांची मागणी केली.
पोलिसांनी तपासासाठी दोन पथके स्थापन केली. पोलिसांनी अपहृत व्यक्तीच्या मोबाईलवरून ठिकाणाचे लोकेशन तपासले. त्या आधारे तपासाला सुरुवात केली. पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपींनी नाईक यांना वाकड परिसरात सोडून पळ काढला. नाईक यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी खंदारे व आरोपींचा उल्लेख केला. खंदारे याच्या मोबाइलच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली.
या सर्व आरोपींना अटक करून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, रामचंद्र घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल, बिभीषण कन्हेरकर, बाबजान इनामदार, राजेंद्र काळे, बापूसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दीपक साबळे, वंदू गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, विक्रांत चव्हाण, कल्पेश पाटील, कौतेंय खराडे, अजय फल्ले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.