पुणे : पुण्यामध्ये सध्या दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टोळक्यांनी धुडगूस घालायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकालमध्ये त्यांनी अनेक अशा टोळक्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. परंतु अद्याप देखील अशा घटना घडतच आहेत. नुकताच एका टोळक्याने “तुझं मुंडक काढून त्यांना फुटबॉल खेळतो की नाही बघ…” अशी धमकी एका तरुणाला देऊन कोयत्याने आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोघेजण सोनार आणि बंदीछोडे यांच्यामध्ये सोमवारी भांडण झालं होतं. यावेळी सोनार यांचे मित्र राहुल मुळेकर सचिन चांची हे बोलत जात असताना विनोद बंदीछोडे व त्याचे साथीदार तिथे आले त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि फिर्यादीचे मित्र सोडण्यात आले असता, त्यांना देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर फिर्यादींना हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी विजय अमृत सोनार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विनोद बंदीछोडे याला अटक केली असून, त्याचे साथीदार सिद्धू बंदीछोडे या दोघांसह अन्य दोघा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.