इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या नऊ सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून कम्प्युटर, तीन लॅपटॅाप, १८ मोबाइल, ९२ हजारांची रोकड असा पाच लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हेमंत गांधी (वय ३८, रा. रास्ता पेठ), अजिंक्य कोळेकर (वय ३०, रा. नाना पेठ), सचिन घोडके (वय ३५, रा. रास्ता पेठ), यशप्रताप मनोजकुमार सिंह (वय २२, रा. मानकढिया, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश), धमेंद्र संगमलाल यादव (वय २५, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), रिग्लम चंद्रशेखर पटेल (वय २२, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश), अनुराग फूलचंद यादव (वय ३२, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), इंद्रजीत गोपाल मुजुमदार (वय ३० रा. उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगाल), सतीश संतोष यादव (वय १८, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोंढव्यातील ब्रह्मा आंगन सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार अणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून आरोपींना अटक केली. घटनास्थळावरून कम्प्युटर, लॅपटॅाप, रोकड, मोबाइल असा पाच लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.