मुंबई – दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे, मुंबईसह अनेक शहरात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली. मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार देखील केला. या विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला धारावी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानाबाबत न्यायालयात बिनशर्त माफी मागण्यात आल्याचं पाठक याचे वकील अॅड. महेश मुळ्येंनी सांगितलं.
दरम्यान, रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने म्हटले होते. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.