पुणे : कोरोना काळामुळे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . कालपासून सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरूच आहेत. पोलीस प्रशासन आणि मंडळांमध्ये समन्वयाच्या मोठ्या अभावामुळे मिरवणूक लांबल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले कि ,”पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ढोल ताशा पथकांमध्ये पडलेल्या अंतरामुळे विसर्जनासाठी वेळ लागत आहे. पोलिसांकडून सकाळपासून मंडळांना पुढे ढकलण्यात येत असून मिरवणूक वेळत संपवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असल्याच सांगितलं आहे.”
आज सकाळी नऊ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ अलका चौकामध्ये पोहोचले, एकंदरीतच दरवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र कोणतेही नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही. शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आणि पहिल्या मानाच्या गणपतीचे अर्थात कसबा गणपतीचे विसर्जन हे सव्वा चार वाजता झाले. तर मानाच्या पाचव्या गणपतीचे अर्थात केसरी वाड्यातील गणपतीचे विसर्जन हे रात्री साडेनऊ वाजता करण्यात आले. त्यामुळे शनिवारी सकाळी सात वाजून गेले तरीही प्रमुख मंडळे मुख्य विसर्जन मार्गावर पोहोचू शकली नाहीत. एकंदरीत परिस्थिती पाहता पोलिसांनी आता सक्तीने विसर्जन मिरवणुका वेळेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.