ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं; आशिष शेलार यांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

330 0

मुंबई – विधीमंडळाने केलेले 12 भाजप आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने आज रद्द केले. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला जोरदार धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी अहंकारात शहाणपण गमावलं असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी न्यायालयाच्या निकालानंतर केली आहे.

राज्य सरकारने भाजप आमदारांविरोधात केलेल्या निलंबनाच्या ठरावावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असून हा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे शेलार यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुप्रीम कोर्टाचा निकाल ऐतिहासिक आहे. सरकारला आपली चूक सुधरवण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिली होती. मात्र, ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं.

ठाकरे सरकारच्या अवैध ठरावामुळे विधीमंडळाच्या पारदर्शी कामकाजाला इजा पोहचली आहे. महाराष्ट्राबद्दल देशात होणारी अवास्तव चर्चा सरकारला थांबवता आली असती. ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च पातळीवर असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महाविकास आघाडील सणसणीत चपराक बसली आहे. राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर होता. संविधानाला धरून नव्हता, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं आहे. न्याय मिळाल्याबद्दल भाजपच्या सर्व आमदारांचं फडणवीस यांनी अभिनंदनही केलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं मी आधीपासून सांगत होतो. हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं मी नमूद केलं होतं. कृत्रिम संख्याबळाच्या जोरावर सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयामागे कोणतंही महत्त्वाचं कारण नव्हतं. म्हणूनच कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं आणि आमच्या बाजूने निकाल दिला, असंही त्यांनी म्हटलं आहे. हा केवळ 12 आमदारांचा प्रश्न नव्हता तर 12 मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक नागरिकांचा प्रश्न होता, असं सांगतानाच सेव्ह डेमोक्रसी असंही त्यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!