पुणे : महाशिवरात्रीनिमित्त (दि .२६ बुधवार) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महत्त्वाच्या बस स्थानकांवरून ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक भाविक शिवदर्शनासाठी शहर व उपनगरातून हजारोंच्या संख्येने जातात. याकरता पुणे महानगरपालिकेने ज्यादा बसेसची व्यवस्था केली आहे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
निळकंठेश्वर (रुळेगाव) ,बानेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी दर वेळेस भाविकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून बसेसच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्यासाठी पहाटे (५:३०) वाजेपासून २० मिनिटांच्या वारंवारितेने २ जादा आणि पर्यायी बस मार्ग क्रमांक ६१, २९३, २९६ व २९६-अ या मार्गांवर ११ बसेस उपलब्ध असणार आहेत.- स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर (रूळेगांव) येथे जाण्यासाठी पहाटे (३:३०) वाजेपासून १५ ते २० मिनिटांच्या वारंवारितेने १२ जादा व पर्यायी बस मार्ग क्रमांक ५२-अ या मार्गावर २ नियमित व जादाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्यासाठी पहाटे (५:१५) वाजेपासून १० ते १५ मिनिटांच्या वारंवारितेने पर्यायी बस मार्ग क्रमांक ३०५, ३४१, ३४२, ३६८ व ३७१ या ५ मार्गांवर एकूण २० बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी या विशेष बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन PMPML च्या वतीने करण्यात आले आहे.