GANESHOTSAV 2025: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला
असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे,
असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
यावर्षीच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळ
यादीतील १२ गडकिल्ले, पर्यावरण आदी विषयावर
जनजागृती करण्याकरिता गणेश मंडळांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी 100 कोटींचा अतिरिक्त निधी द्या
गणेशोत्सव (GANESHOTSAV 2025) हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम,
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ॲड. शेलार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली
असून याबाबत प्रशासनाने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. प्रसिद्ध गणेश मंडळे,
गणेश मंदीराचे भक्तांकरिता थेट प्रक्षेपणाद्वारे घरातूनच दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बँड शो आणि पोलीस दलांचा
बँड शो तसेच डॉग शोचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांना सहभागी करुन उपक्रमाचे आयोजन करावे.
महावितरणने गणेश मंडळांना वीज उपलब्ध करुन द्यावी.
आरती करणाऱ्या भजनी मंडळाना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार असून याबाबतच्या संकेतस्थळाचे उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे,
याचा मंडळांना लाभ देण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी,
गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून शासकीय आस्थापनाच्या इमारती, वारसास्थळांवर
या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबत महत्त्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करुन रोषणाई करावी.
PUNEET BALAN DJ FREE GANESHOTSAV: डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार
विसर्जनाबाबत निर्गमित मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयेाजन,
जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची कार्यवाही करावी. विदेशी विद्यार्थी, नागरिक,
विदेश दुतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे.
भारतीय हवामान विभागाकडून पावसाबाबत देण्यात येणाऱ्या अंदाजानुसार प्रशासनाने तयारी करावी.
गणेश मंडळांनी ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी
यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी.
स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत.
मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन ॲड शेलार यांनी यांनी केले.