आपला गट हीच शिवसेना ! एकनाथ शिंदे यांचा दावा ; धनुष्यबाण मिळवण्यासाठी प्रयत्न

436 0

मुंबई- शिवसेनेसाठी आणखी एक धक्कादायम बातमी अशी की एकनाथ शिंदे यांनी ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेला लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाही. आता काहीच वेळापूर्वी शिवसेनेचे चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे चार आमदार आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.

एकूणच एकनाथ शिंदे यांच्या गटाचे संख्याबळ वाढत चालले आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे
आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील अशी माहिती समोर आली आहे.

घटनातज्ञ उल्हास बापट काय म्हणतात ?

ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले की, किती सभासद आहेत हे आधी सिद्ध करावं लागेल. आता तरी एकनाथ शिंदे यांच्या गटाला कुठलाही कायदेशीर आधार नाही. त्यांना आधी इथं येऊन 37 सदस्य त्यांच्याकडे आहेत हे सिद्ध करावं लागेल. आता जो शिवसेना पक्ष आहे तोच शिवसेना आहे. या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. हे जर तिथं अपात्र ठरले तर विषयच संपतो. जर 37 लोकं आले तर त्यांना चिन्ह मिळवावं लागेल. मग खरी लढाई चालू होईल. राष्ट्रपती राजवट लावायची का नाही? मुख्यमंत्री कोण होणार? यात काही भांडणं झाली तर मात्र सुप्रीम कोर्टाकडे निर्णय जाईल, असं उल्हास बापट म्हणाले.

एकनाथ शिंदे धनुष्यबाणावर दावा करणार, संजय राऊत म्हणाले, करू देत !

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला घाम फुटलाय. त्यातच आता एकनाथ शिंदे आपला गट हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे. तसेच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर ताबा मिळवण्यासाठी शिंदे प्रयत्न करणार आहेत. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत ‘करू देत’ या दोन शब्दात प्रतिक्रिया दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!