एकनाथ शिंदे गट गुवाहटीतून गोव्याच्या दिशेने निघाला, उद्या मुंबईत दाखल होणार!

380 0

गुवाहाटी- महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा केंद्रबिंदू असलेल्या एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटी मधून आपला मुक्काम हलवला असून ते आता गोव्याला जाण्यासाठी निघाले आहेत. शिवसेना तसेच अपक्ष आमदार नुकतेच गुवाहटी विमानतळावर दाखल झाले आहेत. येथून त्यांची विमानं गोव्याच्या दिशेने टेक ऑफ करणार आहेत.

२१ जून पासून महाराष्ट्रात रंगलेल्या नाट्याचा अखेरचा अंक उद्या सुरु होणार आहे. उद्या राज्यपालांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले असून उद्याच्या अधिवेशनात ठाकरे सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे गट आज संध्याकाळी गोव्याला दाखल होणार असून येथील ताज हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. उद्या सकाळी सात वाजेच्या सुमारास एका स्पेशल विमानाने सगळे आमदार मुंबईत येतील.

उद्या बहुमताच्या चाचणीला ठाकरे सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतरच ठाकरे सरकारचे भवितव्य ठरणार आहे. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या या आदेशाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या गोटामध्ये वेगवान हालचाली

ठाकरे सरकारची उद्या बहुमताची परीक्षा होणार आहे. तत्पूर्वी भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. उद्याच्या बहुमत चाचणीसाठी भाजपकडून विशेष रणनीती आखली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!