मोठी बातमी ! ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार

379 0

वाराणसी- ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आला आहे. आता जिल्हा न्यायाधीश ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.

ज्ञानवापी मशिदीच्या केसने देशातील वातावरण तापलं आहे. ज्ञानवापी प्रकरणाची आज (शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयात तिसऱ्यांदा सुनावणी झाली. न्यायमूर्ती वी आय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सर्वोच्चा न्यायालय म्हणाले की, या प्रकरणी अनुभवी न्यायाधिशांनी सुनावणी करावी असे आम्हाला वाटते. सध्या सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांवर आम्हाला काही आक्षेप नाही. परंतु जास्त अनुभवी न्यायाधिशांनी जर हे प्रकरण हाताळले तर याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद प्रकरणी तीन पर्याय ठेवले आहेत. वाराणसी कोर्टाला सुनावणी पूर्ण करु द्या, सुनावणीपर्यंत कोर्ट अंतिम आदेश देऊ शकतं तसेच निर्णय येईपर्यंत अंतरिम आदेश लागू असेल, असे तीन पर्याय दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी सुरू करण्यास आठ आठवड्याचा वेळ दिला आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे च्या अंतरिम आदेशाचे पालन करावे. तसेच जोपर्यंत जिल्हा न्यायाधीश या प्रकरणी काही निर्णयापर्यंत येत नाही तोपर्यंत जिल्हा न्यायाधिशांनी वझूकरता पर्यायी व्यवस्था करावी. तसेच शिवलिंगाची देखील सुरक्षा करावी. शिवलिंगाची सुरक्षा आणि नमाज पठण करण्यात कोणतीही बाधा येता कामा नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालात काय?

ज्ञानवापी मशिदी प्रकरणाच्या सर्वेक्षण अहवालानुसार, उत्तर ते पश्चिमच्या बाजूने चालत गेल्यास मध्यभागी शेषनागासारखी एक कलाकृती दिसून आली. त्याशिवाय या ठिकाणी दिसून आलेल्या अवशेषांनुसार एखाद्या मोठ्या भवनाचे अवशेष असल्याचं दिसून आलं असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशिद प्रकरणातील एक वकील आजारी असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी सुनावणी पुढे ढकलली. तसेच, हिंदू याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलानं सांगितलं की, वाराणसी न्यायालय 23 मे रोजी या प्रकरणावरील सुनावणी सुरू ठेवणार आहे.

Share This News
error: Content is protected !!