पुणे : जनसामान्यांचा आवाज दाबण्याचे काम भाजपा करीत असून जनतेवर दहशत निर्माण करुन लोकशाही धोक्यात आणली जात आहे. माध्यमांची मुस्कटदाबी, एजन्सीचा गैरवापर यासह महागाईने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळी केले आहेत. अनेकांवर खोटे आरोप करुन इडीच्या धाडी टाकल्या जात आहेत.
भाजपाकडून दुसर्यांच्या पक्षावर दरोडा टाकला जात आहे, भाजपा कोणालाही तोंड वर काढू देत नसल्याने सर्वसामान्य जनता त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होणार असून कसब्यात बदल निश्चित होणार आहे. कसब्यातला हाच बदल देशात घडणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने घरोघरी जाऊन प्रचार करा, अशा सुचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना सोमवारी केल्या.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ संत सावता माळी भवन येथे महाविकास आघाडी कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधी मंडळ कॉंग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी उपमहापौर दीपक मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार कमलताई ढोलेपाटील, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर, वनराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, रमेश अय्यर, जयंत किराड, गणेश नलावडे, प्रविण करपे, प्रदीप देशमुख, शानी नौशाद, संगीता पवार, लेखा नायर, शांतीलाल मिसाळ, दीपक जगताप, मृणालिनी वाणी, शिल्पा भोसले, सारिका पारिख, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील म्हणाले, भाजपाला पराजयाचा मोठा धोका वाटत असल्याने त्यांचे वरिष्ठ नेते तळ ठोकून आहे. भाजपाने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केले असून त्यांचे जगणे अवघड केले आहे. गेल्या आठ वर्षात तीन हजारहून जास्त लोकांवर त्यांनी धाडी टाकल्या आहेत. बीबीसीसारख्या माध्यमांवर धाडी टाकून माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. आपल्याला हवे तेच माध्यमात प्रसिद्ध करुन भाजपा खोटेपणा दाखवत आहे. हा त्यांचा खोटेपणाचा भुरखा नागरिक फाडून काढणार आहे.
कसबा विधानसभेतील मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे त्यांच्या विकास कामातून लोकप्रिय आहे. तिन्ही पक्षांची ताकद त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजय निश्चित होणार आहे. मात्र तरीदेखील कार्यकर्त्यांनी गाफील न राहता घरोघरी जाऊन काम करा. हा आपला विजय देशात पुढे नेणार आहे. बुथ कमिटीचे अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष यांनी घरे वाटून शेवटच्या दिवसांपर्यंत काम करा. कसब्यातील विजय देशात गुणगाण करणारा राहणार असल्याने ताकदीने काम करा यश दूर नाही, असे यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला.
.
बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपाचा एकधोरणी कार्यक्रम, हुकूमशाही व महागाईला कंटाळलेला आहे. जनसामान्य भाजपाच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अनुकूल आहे. कसब्यातील प्रत्येक नागरिक सर्वसामान्यांची निवडणूक असल्याची समजून रविंद्र धंगेकर यांचे काम करीत आहे. त्यामुळे हा विजय सर्वसामान्यांचा असणार आहे. भाजपाने जनतेची फसवणूक केली असल्याने या निवडणूकीवर त्याचा परिणाम होणार असून येत्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा महापौर असणार आहे. त्यामुळे निवडणूक स्वतःची समजून काम करा. या निवडणूकीवर महापालिकेची निवडणूक अवलंबून असून पुढील अनेक संधी या निवडणूकीवर आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका, कसबा मतदारसंघातील कोपरान कोपरा पिंजून काढा. भाजपाचे मतदेखील महाविकास आघाडीलाच राहणार आहे. असे यावेळी थोरात यांनी सांगितले.
मोहन जोशी म्हणाले, महाविकास आघाडी पहिल्या दिवशीपासून रविंद्र धंगेकर यांचे काम जोमाने करीत आहे. मतदारसंघातील बैठका, सभा, कोपरा सभा, रॅलीला उर्त्स्फूत सहभाग आहे. महाविकास आघाडीचे नियोजन, समन्वय चांगले असल्याने विजय निश्चित होणार आहे. तिन्ही पक्षांचा कार्यकर्ते, पदाधिकार्याचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंदना चव्हाण म्हणाल्या, महाविकास आघाडीचा प्रचार यंत्रणेत सहभाग आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करीत आहे. शेवटच्या घटकांपर्यंत काम सुरु असल्याने महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, कसबा मतदार संघात बदल होणार आहे. रविंद्र धंगेकर हे आपल्या कामातून लोकप्रिय आहेत. बहुजन समाजापासून व्यापारीवर्ग, ब्राम्हण समाजदेखील त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे यश दूर नाही. रविंद्र माळवदकर, कमलताई ढोले पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. गणेश नलावडे यांनी प्रस्ताविक व सुत्रसंचालन केले. अजिंक्य पालकर यांनी आभार मानले.