मुंबई- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत.
राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आपल्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करत पोलीस खात्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता.
विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना फडणवीस यांनी सभागृहाचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना पेन ड्राईव्ह सुपूर्द केला. माजी मुख्यमंत्र्यांनी दावा केला की पेन ड्राईव्हमध्ये 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, ज्यामध्ये पोलीस आणि महाविकास आघाडीचे सदस्य भाजपाच्या नेत्यांना अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाच्या कार्यालयात कट रचत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करताना म्हटलं होतं की, राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला होता.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकिलपत्राचा राजीनामा दिला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास सीआयडीकडे सोपवण्यात येत आहे. त्यातून वस्तुस्थिती बाहेर येईल अशी मला अपेक्षा असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.