पिंपरी- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. या दरम्यान फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल फेकल्याची घटना घडली. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक एकनाथ पवार यांनी दिलेल्या तक्रारी नंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रविवारी पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले होते. मात्र फडणवीस यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. दुसऱ्या बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी झाल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. याच गोंधळात एका अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचा प्रकार घडला
पिंपळे निलखमधील शहीद अशोक कामटे उद्यानाचे उद्घाटन करून देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पूर्णानगरच्या दिशेने निघाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णानगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप करत प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी एका व्यक्तीने थेट देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल भिरकावली.
फडणवीस यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीकडून झालेल्या विरोधानंतर भाजपचेही कार्यकर्ते आक्रमक झाले. घटनास्थळी तणाव वाढला आणि भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या पार्श्वभूमीवर जमावाला पांगवण्याासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि परिसरात उपस्थित असलेल्या इतर नागरिकांचीही चांगलीच धावपळ उडाली.
भाजपचे नगरसेवक एकनाथ पवार यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.