पुणे- औरंगाबाद शहरामध्ये एकाचवेळी कुरियरने तब्बल 37 तलवारी आल्याची घटना घडलेली असतानाच पुण्यातही कुरिअरद्वारे दोन धारदार तलवारी आल्या. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी ( दि .31 ) दुपारी नियंत्रण कक्षाला मार्केटयार्ड येथील डीटीडीसी कुरिअर द्वारे तलवारी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी मार्केटयार्ड येथील कुरियर कंपनीच्या कार्यालयाची तपासणी केली असता पोलिसांना पार्सलमध्ये दोन धारदार तलवारी सापडल्या.
या तलवारी पंजाब येथील लुधियाना येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्या नावाने या तलवारी मागवण्यात आल्या आहेत त्यांच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
औरंगाबाद येथे देखील एकाचवेळी कुरियरने तब्बल ३७ तलवारी आल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी कुरियरमध्ये अशा संशयास्पद पद्धतीने तस्करी केली जात असल्यास पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन कुरियर कंपन्यांना केले होते . त्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा उघडकीस आला आहे.