पुणे- पुण्यातील कासेवाडी परिसरातील पोलीस चौकीत तीन तरुणींनी गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कासेवाडी परिसरातील रहिवाशी असणाऱ्या तीन स्थानिक तरुणींमध्ये आपसात वाद होता. सर्व तरुणी एकमेकांशी भांडत शिवीगाळ करत होत्या. त्यापैकी एक तरुणी पोलीस भांडणांबाबत फिर्याद देण्यासाठी कासेवाडी पोलीस चौकीमध्ये गेली. तिच्या पाठोपाठ अन्य दोघीजणी पोलीस चौकीत गेल्या. यावेळी महिला पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघींनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्याठिकाणी दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी देखील त्या तरुणींना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर तिघींनी दामिनी पथकातील महिला पोलिसांशी वाद घालून धक्काबुक्की केली. याबाबत खडक पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. गोंधळ घालणाऱ्या तीन तरुणींच्या विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.